तेजोमयी सुरांचे जीवनगाणे - मोरेश्वर निस्ताणे

मोरेश्वर निस्ताने :  तेजोमयी सुरांचे जीवन गाणे

                     
                   मोरेश्वर निस्ताने                                        सुरेश वाडकर यांच्या सोबत मोरेश्वर निस्ताने 
विदर्भ तशीही गुणी कलावंतांची खाण आहे असे आपण म्हणतोच,  पण त्याचा आपणास तेव्हाच प्रत्यय येतो, जेव्हा आपल्या विदर्भाच्या मातीतील कलावंतानी पुण्या मुंबईकडे जावून  आपले नाव कमवले तरच आपण त्याला आपली मान्यता देतो  हा इथल्या वैदर्भीय माणसाच्या स्वभावाचा स्थायीभाव बनलेला आहे.  आज पुण्या मुंबईच्या तोलामोलाचे अत्यंत गुणी असलेले कलावंत हे नागपूर, अमरावती किंवा झाडीपट्टीत दिसून येतात. ज्यांनी आपले संपूर्ण जीवनच सांगितला वाहिलेले आहे, असाच एक मनस्वी कलावंत म्हणजे मोरेश्वर निस्ताने होय. मागील काही वर्षात ज्यांना अगदी जवळून पाहण्याचा योग आला, तेव्हा एक पार्श्व गायक, गजलगायक, संगीतकार म्हणून ते कितीतरी मोठे आहेतच, पण त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून खूप प्रेमळ व कायमच ज्यांच्याबद्दल आपुलकी वाटावी असेच हे गोड स्वभावाचे निगर्वी असे व्यक्तिमत्व आहे. भारताच्या अगदी  हृदयस्थानी वसलेल्या , विदर्भातील संत्रानगरी नागपुरचा अभिमान असलेला , गायन आणि संगीत हाच ज्यांचा प्राण आहे असा हा गोडगळ्याचासरस्वतीचा वरदहस्त असलेला सरस्वतीपुत्र तद्वतच सुप्रसिद्ध कलावंत ! संगीताची आराधना करणाऱ्या घराण्यात जन्म घेतलेल्या मोरेश्वर निस्ताने यांनी संगीताचे प्राथमिक धडे  वडील संगीताचार्य पंडित अमृतराव निस्ताने यांचेकडून गिरविले. यावेळी आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याचे सांगीतिक विशेष ज्ञान अर्जन करतानाच  पद्मभूषण कै. पं. रातंजनकर, कै.पं. नारायणराव पाठक, कै. गुरुवर्य पं. राघोबाजी मुठाळ यांचे सारख्या अनेक मोठ्या संगीताचार्यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले.  यातूनच त्यांच्यातील कलावंत तयार होत गेला.आज घडीला त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासाकडे वळून बघ्तले तर  मागील २५ वर्षांपासून गझल, भक्तीगीत, लोकगीत, देशभक्ती गीत अशा  सुगम संगीताच्या सर्वच प्रकारात गायक आणि संगीतकार म्हणूनत्यांनी  आपली आगळी मोहोर उमटवलेली आहे.  याच सांगीतिक पाठबळाच्या जोरावर नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिकांसाठी पार्श्वगायन, शीर्षक गीत गायन आणि संगीत नियोजक अशा आव्हानात्मक विविध स्वरूपाच्या  भूमिका त्यांनी एकाच वेळी अतिशय यशस्वीपणे वठविलेल्या दिसून येतात.  आपल्या ऐन उमेदीच्या काळातच त्यांनी गुरुदक्षिणा, हु एम आय, दो दीवाने शहर में, कर्तव्य, तीन मुजरिम, २०११ या हिंदी चित्रपटांचे तर लाल चुडा, ते दोन दिवस, भला माणूस, साथ तुझा भेटला, बकाल या मराठी चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडत नवा इतिहास रचलेला आहे. विदर्भातील एखाद्या गायक संगीतकारांनी अशा प्रकारचे दुर्मिळ यश राम-लक्ष्मण जोडीतील राम म्हणजेच  विजय पाटील यांच्यानंतर त्यांनीच प्राप्त केलेले आहे. ही विदर्भ वासियांसाठी अत्यंत अभिमानास्पद अशीच गोष्ट आहे. याशिवाय ब-याच मराठी मालिकांसाठी सुद्धा त्यांनी काम केलेले असून याची यादी दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. यात जसे करावे, कर्तव्य, अभियान, सौगात, नृत्यांजली, अस्मानी सुलतानी, युगांतर, निष्कृती, ऊन सावली, संजीवनी, काही बोलायचे आहे, रिश्तों की डोर, भेटी लागी जीवा, अधिकार या टीव्हीच्या विविध व्यावसायिक  चॅनल्सवरील हिंदी- मराठी मालिकांच्या संगीत दिग्दर्शनाच्या माध्यमातून मोरेश्वर निस्ताने हे नाव जगभरातील हिंदी मराठी भाषिकांच्या घराघरात पोहोचलेलं आहे. याबरोबरच नुकताच टी- सिरीजचा सांजरंग हा अत्यंत सुमधुर व कर्णप्रिय असा डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी लिहिलेल्या भावगीत व गजलांचा अल्बम सुरेश वाडकर, अनिरुध्द जोशी यांच्यासोबत येत आहे.  आज मायबाप रसिकांच्या  हृदयात मोरेश्वर निस्ताने यांच्या गोड संगीतानं घर केलेलं आहे. सुविख्यात पार्श्वगायक सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, श्रीधर फडके, उदित नारायण, साधना सरगम, शहनाज अख्तर, अनुप जलोटा, अनिरुद्ध जोशी, धनश्री देशपांडे, सुचित्रा बर्वे भागवत, विजय गटलेवार, शकुंतला जाधव , वैशाली भैसने-माडे अशा नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत गायकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला नागपूरचा एकमेव गायक आणि संगीतकार म्हणजे मोरेश्वर निस्ताने होय . आज त्यांनी संगीताच्या क्षितिजावर घेतलेली झेप ही त्यांना यशोशिखरावर नेवून कीर्तीचे नवे नवे उच्चांक गाठत आहे.महाराष्ट्रच नव्हे तर  मुंबई, गोवा, सांगली, सातारा, दिल्ली, रत्नागिरी, कोल्हापूर अशा देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये सुगम संगीताच्या मैफिली रंगविणाऱ्या मोरेश्वर निस्ताने यांनी आकाशवाणी, दूरदर्शन, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, युवक बिरादरी आदीच्या माध्यमातून गीत संगीताचे देशभर कार्यक्रम सादर करून  त्यांनी आपली  स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. ऑल इंडिया रेडीओच्या  तसेच दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त उच्चश्रेणी कलावंत असलेल्या मोरेश्वर निस्ताने यांनी  आजपर्यंत अनेक पुरस्कार सुद्धा  मिळविलेले आहेत. आजपर्यंत त्यांना मिळालेल्या संगीत क्षेत्रातील अनेक  पुरस्कारांपेक्षा संगीत रसिकांची दाद आणि संगीतप्रेमींची पाठीवर शाबासकीची थाप, केवळ याच अपेक्षेने संगीत क्षेत्राची प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत. संगीत क्षेत्राची सेवा करताना आपल्या गुरूंचा घेतलेला वसा  पुढे नेवून एक असा कलावंत की, ज्याचे जीवनच संगीताने गाणे झालेले आहे अशा या नागपूरच्या या हरहुन्नरी पार्श्वगायक आणि संगीत दिग्दर्शकास मानाचा मुजरा करतांनाच गुणगुणावेसे वाटते 

तुझ्या सुरांची पालखी निघाली 
सोबतीला स्वरांचे सात दिवाऩे...! 
जुळुन येता हे गीत शब्दांचे
तुझ्या स्वरांचे नवे नवेच गाणे......!

                                                तुझ्या स्वप्नांचे गीत नवे हे
                                                तुझ्या सुरांची नवी कहाणी 
                                                काळीजातुनी लिहीतो आता
                                                ही धुंद यशाची नवीचं गाणी…!

इंद्रधनुच्या सप्त रंगामधुनी 
बहरुन येती नवे नवे तराणे
जुळुन येता हे गीत शब्दांचे
तुझ्या स्वरांचे नवे नवेच गाणे......!! 1!! 

डॉ.  राजु श्रीरामे
भ्रमणध्वनी : ९०४९९४०२२१
                ७६२०८८१७२९   

Popular posts from this blog

भारत–कॅनडा युरेनियम पुरवठा करार आणि भविष्य

नेपाळमधील नवीन सरकार आणि भारत-नेपाळ संबंध : संधी की आव्हान?

संभ्रम विरुद्ध वास्तव : भारत–अमेरिका व्यापार कराराचा ऐतिहासिक विजय