मृगजळ

          मृगजळ

डॉ. राजू श्रीरामे

काही माणसं खरंच मनाच्या कप्प्यात झाकून ठेवाविशी वाटतात. त्यांना कधीच कुठेही उघड करावंसं वाटतं नाही. फक्त त्यांना हृदयात जपून ठेवावेसे वाटते, खरंच आपली आवडती माणसं अशी असतात की त्यांच्या मनात सतत वाकून बघावंसं वाटतं…! त्यांनी नको म्हंटलं तरीही. आपल्याला त्यांच्याबद्दल आकर्षणच इतकं वाटतं की, त्यांनी एक खिडकी बंद केली तरी त्यांच्या मनाची दुसरी खिडकी उघडून आपण आत डोकावायला बघतो. ही व्यक्ती जर तुम्ही जिच्या किंवा ज्याच्या प्रेमात पडले असाल ती व्यक्ती असेल तर मग तिने अनेकदा आपल्या मनाची खिडकी बंद करून घेतली तरी तुम्ही अजून एक तिच्या मनाची नवी खिडकी शोधता... पण, त्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न सोडत नाही.      

       ती व्यक्तीही तुमच्यावर प्रेम करत असेल, तर नक्कीच तिने खट्याळपणे जर एक खिडकी बंद केली, तरी ती व्यक्तीही स्वतःच तुम्ही दुसऱ्या खिडकीत यावं म्हणून वाट बघट असते.

      माणसांना जाणून घेण्यासाठी अशा अनेक खिडक्या असतात. आपण खरंच त्या सर्व खिडक्यांमधून वाकून पाहिल्याशिवाय आपलं स्वतःचं वेगळं मत बनवून मोकळे होतो नाही का? 

मला वाटतं, जर एखाद्या व्यक्तीला सगळ्या खिडक्या बंद करून रहायची सवय असेल तर हा इतरांवर खरं तर त्या जवळच्या व्यक्तीवर तर अन्याय आहेच, पण, ती व्यक्ती त्या खिडक्या बंद करून स्वतःवरही अन्याय करतेय असं मला वाटतं. मला  स्वतःला काही बंद, काही उघड्या हे कॉम्बिनेशन आवडतं. बाहेरचा उजेड आत येऊ देणं हे ही निरोगी मनासाठी, आपली प्रेमाची आस भागवण्यासाठी आवश्यक आहे. त्या उबेची, प्रेमाची सुद्धा गरज असते. पण, दुर्दैवाने सर्वानाच प्रेम सहजरित्या नाही मिळू शकत. ते मृगजळ बनून राहतं आयुष्यात..!

पण, कधी कधी असंही होतं की तुम्ही त्या खिडकीत आत किंवा बाहेर उभे असता…! पण कधी कोणी येतच नाही.. त्यावेळी कितीदा नव्याने तुला आठवावे या ती सध्या काय करते या गाण्याचे हे बोल समर्पक वाटतात..!

काही अनामिक श्वासासाठी हे मृगजळ…!