हिंदू अर्थशास्त्र :वैश्विक आर्थिक कल्याणाचा तिसरा मार्ग
हिंदू अर्थशास्त्र :वैश्विक आर्थिक कल्याणाचा तिसरा मार्ग
डॉ. राजू घनश्याम श्रीरामे
भ्रमणध्वनी : ७६२०८८१७२९
ईमेल- smitarajan76@gmail.com
बॉक्स
अंतिमत: आत्मनिर्भरतेची संकल्पना ही इतरांसाठी करावा लागणारा त्याग व मर्यादित गरजातून महत्तम समाधान या तत्त्वातून निर्माण झाली आहे. स्वत:च्या गरजाच्या पूर्तीसाठी स्वयं उत्पादन करणे हा त्यावर एकमेव उपाय आहे. ही आर्थिक स्वावलंबनाची संकल्पना असून तीचे ध्येय हे आत्मनिर्भरतेकडे जाताना दिसून येते.
लेख
आज संपूर्ण जग आपआपल्या देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध आर्थिक विकासाचे प्रारूप मांडत असल्याचे दिसून येत आहेत. भांडवलवादी देश अत्युच्च उपभोगाच्या संकल्पनेवर आधारित आर्थिक विकासाच्या प्रारुपांची निर्मिती करीत आहेत. मात्र तिसऱ्या जगातील अविकसित देश द्विधा मनस्थितीत अडकलेले असून विकासाच्या कुठल्या प्रारुपाचा स्वीकार करावा असा प्रश्न अशा देशांच्या अर्थव्यवस्थेला पडलेला आहे. विकसित देशाच्या प्रारुपातून अनुकरणीय सैद्धांतिक तत्वाचा विचार करता, ते कुठल्याही परिस्थितीत अविकसित देशांना लागू पडत नसल्यामुळे अशा अनेक अविकसित देशाच्या अर्थव्यवस्थांचे आर्थिक शोषण मोठ्या विकसित देशांनी सुरु केले असल्याचे दिसत आहे. यातून मात्र आशियायी व आफ्रिकन देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीची मात्र प्रचंड लुट विकसित देश मोठ्या प्रमाणात करीत आहेत. आज गरीब अविकसित देश विकसित देशांच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. यातून अशा अविकसित देशाच्या नैसर्गिक संपत्तीचे दोहन मात्र मोठ्या प्रमाणात केले जात आहे. गरीब देशांनी आपले स्वातंत्र्य विकसित देशांचा अविकसित देशातील वाढत्या हस्तक्षेपामुळे विकसित देशाकडे गहाण पडलेले आहे. अशा परिस्थितीत मात्र भारतीय अर्थव्यवस्था आता विदेशी कर्जाच्या विळख्यातून बरीच सावरलेली असून ती आपली उत्तमोत्तम प्रगती स्वत:च्या सैद्धांतिक रचनेतून करीत आहे. तिच्या यशाचे गमक देशाच्या आत्मनिर्भर भारत या आर्थिक धोरणातून उमटलेले आहे. अंतिमत: आत्मनिर्भरतेची संकल्पना ही इतरांसाठी करावा लागणारा त्याग व मर्यादित गरजातून महत्तम समाधान या तत्त्वातून निर्माण झाली आहे. स्वत:च्या गरजाच्या पूर्तीसाठी स्वयं उत्पादन करणे हा त्यावर एकमेव उपाय आहे. ही आर्थिक स्वावलंबनाची संकल्पना असून तीचे ध्येय हे आत्मनिर्भरतेकडे जाताना दिसून येते. जगातील आर्थिक संकट हेच मुळात महत्तम उपभोगातून महत्तम उत्पादन केल्यामुळे निर्माण झालेले आहे. हे संकट भांडवलवादातील अनियोजित उत्पादन पद्धतीमुळे निर्माण होत असते. या आर्थिक संकटामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत दोष निर्माण होतांना दिसून येतात. दुसरीकडे समाजवादी अर्थव्यवस्थेच्या प्रारुपात मर्यादित उत्पादनाच्या प्रक्रियेतून जनमानसात निर्माण होणारी अस्वस्थता ही न्यून उपभोग संकल्पनेला जन्म देते. यामुळे सुध्दा किंमतवाढ आर्थिक तेजीचे संकट निर्माण होतांना दिसून येते. अशावेळी तिसरा मार्ग हा अत्यंत महत्वाचा असून तो म्हणजेच भारतातील हिंदू जीवन पद्धती होय. हिंदू जीवन पद्धती ही या देशाच्या मातीत रुळलेल्या, कुठल्याही जाती धर्माच्या लोकांची या मातीशी जुळलेली नाळ यांच्याशी संबंधित आहे. भारतीय जीवन पद्धतीवर भारतीय सभ्यता व संस्कृतीचा असलेला प्रभाव हे याचे कारण आहे. हिंदू अर्थशास्त्र हे वैश्विक कल्याणाचा मार्ग दाखवीत असून यात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा मार्ग दिसतो. येथील विविध सणांच्या माध्यमातून विविध वर्गातील विखुरलेल्या भारतीय जनमाणसाला सर्वसमावेशी रोजगाराची प्रेरणा मिळत असते. येथील विविध सणांची काळानुसार झालेली निर्मिती हीच विविध व्यवसायाला धरून केलेली आहे. देशाच्या विविश प्रदेशात वेगवेगळ्या हंगामानुसार विविध धर्मियांचे विविध सण साजरे होतांना दिसून येतात. अशा स्थितीत या देशाच्या आर्थिक विकासासाठी तिसऱ्या मार्गाचे विकास प्रारूप आर्थिक उन्नतीचा तिसरा मार्ग दाखवत आहे. 'तिसरा मार्ग' हा जागतिक आर्थिक संकट कायमस्वरूपी टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. हा मार्ग दत्तोपंत ठेंगडी यांच्या ‘तिसरा मार्ग’ या विचारातून स्पष्ट दिसून येतो. भांडवलवाद आणि समाजवाद ह्या दोन पर्यायी वैचारिक व्यवस्था ह्या आर्थिक शोषणावर आधारित आहे. या देशाचे नेहरूवादी प्रारूप समाजवादी विचारावर आधारित आहे. परंतु १९४७ पासून तर १९९१ पर्यंतच्या देशाच्या आर्थिक विकासाची समीक्षा केली असता याकाळात आर्थिक विकास अत्यंत मंद गतीने झाला असल्याचे दिसून येते. भारताने जागतिक अर्थकारण आणि आर्थिक उदारीकरणाचा स्विकार हा १९९१ नंतरच केला. हा आर्थिक विकास सन २०१० पर्यंत विकुंचीत झालेला आहे. यापुढे २०११ नंतर त्यात थोडी गतिमानता आली. भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वंकष विचार केला असता ती सामाजिक आर्थिक शोषणावर आधारित अहोती तेव्हा कधीच विकास करू शकली नाही. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेने सर्व समावेशी विकासाचे ध्येय जेव्हा पासून स्वीकारले तेव्हापासून आर्थिक विकासाच्या गतिमानतेला वेग आला. यासाठी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रारूप हे इतरांच्याच्या शोषणावर नव्हे तर शाश्वत सह-अस्तित्वावर आधारित असले पाहिजे हे स्पष्ट होते. यासाठी देशात स्थिर जागतिक तत्व स्वीकारणारी व्यवस्था असली पाहिजे. देशात शोषण विरहित व्यवस्था हवी असेल तर यासाठी हिंदू विचारांचा ‘तृतीय मार्ग’ स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.. देशी विचारांचे स्वदेशी अर्थशास्त्र हेच हिंदू अर्थशास्त्र आहे. हे अर्थशास्त्र भोगावर नव्हे तर त्यागावर आधारित आहे. हे अर्थशास्त्र अनियोजित आर्थिक व्यवस्थाचा स्वीकार करण्याऐवजी संतुलित गरजांना महत्व कसे द्यावे हे सांगते. आज जागतिक अर्थव्यवस्थेवर आणखी एका जागतिक मंदीचा धोका निर्माण होत आहे. जगावर भांडवलशाहीचे संकट पुन्हा येऊन ठेपले आहे. विद्यमान काळात मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट आर्थिक मॉडेल्स आधीच मृत झालेले आहेत. अशास्थितीत भांडवलशाही मॉडेल्सने चाललेली जागतिक अर्थव्यवस्था नियमित अंतराने येणाऱ्या एक किंवा दुस-या आर्थिक संकटाने वारंवार हादरली आहे. हे आजचे भीषण सत्य आहे. जगातील सर्व देशांना शाश्वत आर्थिक वाढ आणि विकास प्रदान करण्यासाठी साम्यवाद आणि भांडवलशाही हे दोन्ही मॉडेल फसलेले आहेत. अशावेळी पर्यायी आर्थिक मॉडेलचा विचार करण्याची गरज व त्याची उपयुक्तता ही फक्त तिसऱ्या मार्गामध्ये दिसून येत आहे. ‘तिसरा मार्ग’ ही संकल्पना दत्तोपंत ठेंगडी यांनी तयार केली आहे. देशातील पाश्चिमात्य आणि डाव्या विचारसरणीचा स्वीकार करणाऱ्या अर्थतज्ञांनी, भारतीय आर्थिक धोरणाच्या चौकटीत राहूनही या विचारांना मान्यता मिळू नये म्हणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत. देशातील आजच्या धोरणकर्त्यांचे लक्ष त्यांच्या या विचाराकडे जाऊ नये याची आतापर्यंत विशेष काळजी घेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या चौकटीत भविष्यातील अर्थशास्त्र काय आहे? याचे उत्तर हे हिंदू अर्थशास्त्र आहे. भारतीय साहित्यातील अर्थ विचार विषयक सिद्धांत शोधत असतांना हा विचार पवित्र वेद आणि वैदिक साहित्यात सापडला. यात मांडल्या गेलेल्या नव्या सिद्धांताची पूर्वपीठीका सापडली. आर्थिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आजचा उपभोक्ता वर्ग, मार्क्सवादी विचार आणि भांडवलवादी स्थूल अर्थशास्त्र असलेल्या केनेशियन अर्थशास्त्राचा विचार करतो. या उपभोक्त्याला तिसरा विचार देण्याचे कार्य ‘हिंदू अर्थशास्त्र’ या विचाराने केलेले आहे. हे अर्थशास्त्राचा स्वतंत्र तिसरा विचार मांडणारे इकोनॉमिक स्कूल आहे. ज्याला हिंदू स्कूल ऑफ इकोनॉमिक्स असे मानले जाते. हे एक ‘हिंदू अर्थशास्त्र’ उलगडण्याचा संकल्प विचार आहे. या हिंदू अर्थशास्त्र संकल्पनेत देशातील कुराण, बायबल आणि गांधीवादी अर्थशास्त्रात जे काही उदात्त आहे ते पूर्ण व्यापक अर्थाने वैश्विक दृष्टीकोण समोर ठेवून मांडलेले आहे. हे सैद्धांतिक प्रारूप विश्वची माझे घर मानणाऱ्या वैश्विक विचारांची पूर्तता करणारे आहे. “भौतिकवादी जग असलेल्या पश्चिममी देशामध्ये असे मानले जात होते की, पदार्थ मूलभूत आहे. मन हे केवळ एक आहे. या तत्वांवर समाजाची अधिरचना निर्माण केली गेली आहे. परंतु सामाजिक-आर्थिक व्यवस्था मूलभूत ही होती. एकदा याचा योग्य क्रम प्रस्थापित झाला की, लोकांच्या मनातील मानसिक बदल आपोआप घडतात. हा विचार मांडला गेलेला होता. हा भांडवलवादी विचार बरोबर नव्हता, हे आता निःसंशयपणे सिद्ध झालेले आहे.” ‘हिंदू अर्थशास्त्र’ या सैद्धांतिक विचार प्रवाहामध्ये धर्म हा मध्यवर्ती भूमिका बजावतो. इथे कोणत्याही धर्माची कोणत्याही धर्माशी तुलना करता कामा नये. हा अपरिवर्तित वैश्विक नियमांचा संच आहे. हिंदू अर्थशास्त्रानुसार कायदे शाश्वत आहेत, त्यातील क्रम मात्र हा क्षणिक आहे. हिंदू अर्थशास्त्रानुसार प्रस्तावित नवीन जागतिक व्यवस्थेची व्याख्या करताना “धर्म प्रत्येक मानवी समूहाला त्याच्या स्वत:च्या अद्वितीय प्रतिमानातून सामाजिक-पूर्ती शोधण्यासाठी स्वायत्ततेची कल्पना करून देत असतो. अशा सर्व गटांचे मानसिक एकीकरण सामंजस्यपूर्ण आणि परस्परपूरक अशा समान चौकटीत आहे. एका जगाचे परस्परसंबंध हे एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे असेल तर वसुधैव कुटुंबकम हा विचार प्रत्येक गट स्वीकारू शकतो. मानवतेच्या सामूहिक शहाणपणात स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान देऊन सामान्य, मानवी समज आणि त्यातून संपूर्ण समाज समृद्ध करतो. हा विचार वैचारिक गैरसमजूत नाही तर ते शुद्ध अर्थशास्त्राचा एक स्वदेशी सैद्धांतिक विचार व सिद्धांत आहे. याची सैद्धांतिक मुलतत्वे ही प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये दिलेली आहेत. ती फक्त शोधावी लागतात. मात्र आपण आर्थिक सिद्धांतांची चाचणी घेण्यासाठी पाश्चात्य साधनांचा वापर करताना दिसून येते. आपल्या धर्मग्रंथात वेगळा अर्थविषयक विचार कधीच नव्हता. वास्तविक आजपर्यंत जगातील आर्थिक समस्या व आव्हानांचे निराकरण करण्यासाठी तसेच त्यांच्या उपयोगाची चाचणी करण्यासाठी पुराव्यावर आधारित पाश्चात्य साधनांचा यशस्वीपणे वापर केलेला आहे. पाश्चात्य आर्थिक मॉडेल्सना भेडसावणारी प्रत्येक कोंडी प्राचीन ग्रंथांमध्ये विस्तृत आणि स्पष्ट केलेली आहे. ही समस्या ‘हिंदू अर्थशास्त्र’ मधील साधने आणि सिद्धांतांद्वारे यशस्वीरित्या सोडवली गेलेली आहे. “पवित्र वेदांमध्ये बाजार, पुरवठा आणि मागणी, किंमत, व्यापार, व्याज आणि नफा तसेच कर यांचे स्पष्ट संदर्भ दिलेले आहेत. दिलेल्या मजकुराद्वारे उत्पन्नासाठी मालमत्ता नसलेल्या लोकांसाठी भाटक - भाडे आणि मजुरी हे उत्पन्न स्त्रोत दिलेले आहे. अर्थव्यवस्थेचे नियमन करणारे व्यापारी कायदे संहिताबद्ध केलेले आहेत. “आर्थिक विचारांचा इतिहास वेदांपासून महाभारतापर्यंत, विशेषत: शांती-पर्व आणि विदुर-नीतीपर्यंत प्रवाहित आहे. याज्ञवल्क्य, गौतम, शुक्राचार्य, कौटिल्य इत्यादींच्या स्मृतींचे अनुसरण ही आर्थिक नीती आहे. पारंपारिक हा विचार चलांच्या परिमाणांच्या काही मोजमापांसह आर्थिक क्रियाकलापांची संहिता आहे. उत्पादनाची किंमत, बाजारभाव, नफ्याची टक्केवारी, कराची टक्केवारी, मजुरी-दर, व्याजदर इत्यादी कोडीबद्ध स्मृतींमध्ये नमूद आहेत. यातून विशिष्ट गटातील स्पर्धा आणि मक्तेदारी स्पष्टपणे ओळखली जावू शकते. यात परकीय व्यापाराचे स्पष्टीकरण दिले गेलेले आहे. या ग्रंथातील सांकेतिकीकरण हा शेवटचा टप्पा आहे. कौटिल्याचा अर्थशास्त्र हा प्राचीन भारतातील अर्थशास्त्रावरील शेवटचा ग्रंथ आहे. आताच्या काळातील ‘आत्मनिर्भर भारत’ आणि विशेषत: स्वयंरोजगारावर मोदी सरकारचे मुख्य लक्ष हे ‘हिंदू अर्थशास्त्र’चे सकारात्मक प्रतिबिंब आहे. भविष्यातील जागतिक आर्थिक संकटाला तुलनेने कमी नुकसानीसह अधिलिखित करण्यात भारताला मदत होण्याची यातून जास्त शक्यता आहे.
( लेखक हे जीवन विकास महाविद्यालय देवग्राम येथे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक असून रा तू म नागपूर विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत)